अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे मराठी चित्रपट खरेदी-विक्री, अनुदान व वितरण परिषद संपन्न!
मंगळवार, दिनांक २१ जून २०२२ रोजी दादर येथील अॅवन हॉटेलच्या सभागृहात *मराठी चित्रपट खरेदी विक्री,अनुदान व वितरण परिषद* यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेमध्ये अनेक मान्यवर वितरक, सेटेलाईट हक्क खरेदीदार, विविध ओटीटी चॅनेलचे प्रतिनिधी, दुरदर्शनचे प्रतिनिधी, थिएटर्सचे प्रतिनिधी उत्स्फुर्तपणे उपस्थित होते. महाराष्ट्रातील सत्तावीस निर्माते आपले वेगवेगळ्या विषयांवर निर्माण केलेले उत्कृष्ट मराठी चित्रपट घेऊन या परिषदेला आवर्जून उपस्थित होते. परिषदेची औपचारिक सुरूवात निर्माता महामंडळाचे महासचिव शरदचंद्र जाधव यांनी केली. तर प्रास्तविक उपाध्यक्ष संजय दिक्षित यांनी केले तर अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री देवेंद्रजी मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून या परिषदेची आवश्यकता, उद्देश व ध्येय विषद केले. तर संचालक महेश बनसोडे यांनी आपले चित्रपट निर्मिती विषयक विचार मांडले, या परिषदेत अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट प्रदर्शन, चित्रपटगृह, वितरण, विक्री, अनुदान ईत्यादी विषयक प्रश्न विचारले तर मान्यवरांनी त्यांची समर्पक उत्तरे दिली. त्यानंतर वितरक, चॅनेलचे व ओटीटीचे प्रतिनिधी आणि निर्माते यांच्या स्वतंत्रपणे आमनेसामने मुलाखती झाल्या. एकमेकांची व्यक्तिगत ओळख निर्माण करण्यात आली. चित्रपटांच्या माहीतीचे आदानप्रदान करण्यात आले.
या परिषदेस प्रसिध्द वितरक श्री राजेश थडाणी, सेटेलाईट हक्क खरेदीदार श्री दिपेश सोनी, संजय मेहता,शेमारू गृपचे कल्पेश मोदी, श्री जयेश विरा, अल्ट्रा गृप, दुरदर्शनचे श्री शिवाजी गंगावणे साहेब, ओटीटी एक्सपर्ट प्रतिनिधी सोनाबर सिध्दिकी, वितरक श्री राजू कांबळे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी उपस्थित निर्मात्यांचे चित्रपट बघून योग्य ते मार्गदर्शन व व्यवहार करण्याचे आश्वासन दिले. सर्वांनी निर्माता महामंडळाच्या या अभिनव उपक्रमाचा चित्रपट खरेदी विक्री साठी नक्कीच फायदा होईल अशी ग्वाही देऊन महामंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
या परिषदेचे आयोजन महामंडळाच्या सदस्या सौ. साधना मोरे, महामंडळाचे कार्यवाहक श्री रुपेश शितोळे, श्री राजु शेवाळे यांनी अत्यंत सुटसुटीतपणे केले.
Comments